लोकमत कोल्हापूर आवृत्ती,
दिनांक : १३/८/२०१४.
‘प्रतिसाद’चा गाशा गुंडाळला |
कंपनीचे निवेदन : म्हणे, पैसे परत देणार |
कोल्हापूर : ‘तुम्ही फक्त सहा हजार रुपये भरून मेंबर व्हायचे, वर्षभर तुम्हाला म्हशीचे एक लिटर दूध घरपोच देणार,’ अशी जाहिरातबाजी करून सुरू झालेले ‘प्रतिसाद’ दूध अखेर बंद झाले आहे. अनियंत्रित वितरण व्यवस्थेला कंटाळून व असंख्य दबावामुळे दूध बंद करत असल्याचे निवेदन संबंधित साखळी योजनेच्या संयोजकांकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. हे असेच होणार असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २६ फेब्रुवारी २0१४ रोजी दिले होते. दरम्यान, यासंदर्भात नेमकी वस्तुस्थिती जाण्यासाठी प्रतिसाद दुधाचे प्रमुख अमोल पोतदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. कोल्हापुरात सुमारे ५५0 लोकांनी या साखळी योजनेत नोंदणी केल्याचे सांगण्यात येत होते. ही कंपनी बत्तीस शिराळा येथील फत्तेसिंहराव नाईक सहकारी दूध संघाकडून १७00 लिटर दूध घेत होती. परंतु त्यांनाही फसवणुकीचा अंदाज आल्यावर मार्चपासून त्यांनी दूध पुरवठा बंद केला. त्यानंतर येलूरजवळच्या एका दूध संघाकडून दूध घेतले जात होते. रीतसर ४३ रुपये ५0 पैसे लिटरने दूध घेऊन ते ग्राहकांना १६ रुपये ६0 पैशांने पुरविण्यात येत होते. नव्या वर्गणीदारांकडून पैसे घेऊन जुन्या वर्गणीदारांना दूध पुरवठा केला जात होता. आपण कोल्हापूरकराची सेवा करत आहोत, अशा स्वरूपाची मोठमोठी होर्डिंग्जही मध्यंतरी सार्या शहरभर लावली होती; परंतु तरीही योजनेस फारसा प्रतिसाद नव्हता. गेल्या चार दिवसांपासून उचगाव व अन्य परिसरातूनही लोकांच्या दूध मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. तोपर्यंत आज दूध बंदच करण्यात आल्याचे जाहीर केल्याने ग्राहकांतही गोंधळ उडाला. ज्यांचे पैसे द्यायचे आहेत ते घरपोच देणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. कंपनी महिलांकडून एक ‘इंडेम्निटी बाँड’ लिहून घेत असे. त्यानुसार सहा हजार रुपये भरून वर्षभर म्हशीचे एक लिटर दूध घरपोच पुरविले जाणार आहे. गायीच्या दुधासाठी पाच हजार रुपये घेतले जात होते. |